MHADA Lottery 2026 | मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर असावे, हे अनेक मध्यमवर्गीयांचे मोठे स्वप्न असते. वाढत्या मालमत्ता किमतींमुळे खासगी प्रकल्पांमधील फ्लॅट सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत म्हाडा मुंबई मंडळाकडून घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. लवकरच सुमारे 2500 घरांसाठी संगणकीय सोडत जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सोडत एप्रिल 2026 मध्ये काढण्याची तयारी सुरू असून त्यासाठीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या सोडतीमुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकतो. (MHADA Mumbai Lottery)
सोडतीची जाहिरात कधी येणार? :
म्हाडा मुंबई मंडळाकडून या गृहसोडतीसाठीची अधिकृत जाहिरात मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व अर्जांची तांत्रिक तपासणी करण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत संगणकीय पद्धतीने अंतिम सोडत काढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना निकालाची प्रतीक्षा फार काळ करावी लागणार नाही.
MHADA Lottery 2026 | कोणत्या भागात मिळणार घरे? :
या गृहसोडतीत मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. बोरिवलीतील मागाठाणे, विक्रोळी, सायनमधील प्रतीक्षा नगर तसेच गोरेगाव आणि मुलुंड परिसरातील काही प्रकल्पांमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी राहण्यासाठीची सुविधा आणि कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (MHADA Lottery 2026)
विशेष म्हणजे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक 1221 घरांचा समावेश करण्यात आला आहे. तर गोरेगावमधील पत्राचाळ परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी 85 घरांची योजना प्रस्तावित आहे. काही घरांच्या किमती कोटींच्या आसपास असण्याची शक्यता असली तरी मुंबईतील खासगी बाजारपेठेच्या तुलनेत त्या तुलनेने परवडणाऱ्या मानल्या जात आहेत.
एकूणच, म्हाडाच्या या गृहसोडतीमुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याची संधी अनेक कुटुंबांना मिळू शकते. त्यामुळे या लॉटरीची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.






