Medha Manjrekar Cancer |मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी चाहत्यांसोबत अत्यंत भावूक बातमी शेअर केली आहे. आपल्याला कर्करोगाचं निदान झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं असून शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या कठीण उपचारांचा प्रवास त्यांनी मन हेलावून टाकणाऱ्या शब्दांत मांडला आहे.
मेधा मांजरेकर कॅन्सरग्रस्त
मेधा मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत कॅन्सरवरील उपचारांचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती दिली. वाढदिवस जवळ आल्याच्या निमित्ताने त्यांनी मागील काही महिन्यांतील संघर्ष आठवत हा प्रवास आयुष्य कायमचं बदलून टाकणारा ठरल्याचं म्हटलं.
कॅन्सरवर यशस्वी मात
पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, कर्करोगाचं निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन या उपचारांपेक्षा त्या काळात मिळालेलं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद अधिक लक्षात राहिले. अनेक वेळा पुढे चालण्याची ताकद उरली नाही असं वाटलं, पण प्रत्येक वेळी कुणीतरी मदतीला धावून आलं. देवाने विविध व्यक्तींच्या रूपाने आपला हात धरला, अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.
मेधा यांनी पुढे सांगितलं की, या प्रवासामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. गुरूंनी शिकवलेल्या ‘शरणागती’च्या विचारामुळे त्यांनी “माझ्यासोबतच असं का?” हा प्रश्न विचारणं सोडलं. प्रत्येक आव्हानामागे एक उद्देश असतो, यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाने हा कठीण काळ पार केला.
कुटुंबाच्या पाठिंब्याचा उल्लेख करताना त्या अधिकच भावूक झाल्या. “आई कायम मुलांचा हात धरून ठेवते असं वाटतं, पण एक दिवस मुलंच आईचा हात धरतात,” असं म्हणत त्यांनी आपल्या मुलींचे आभार मानले. तसेच या कठीण काळात खंबीर साथ दिल्याबद्दल पती महेश मांजरेकर, बहीण, नातेवाईक आणि मित्रपरिवाराचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, केतकी माटेगांवकर, सई मांजरेकर, नीना कुळकर्णी, नेहा पेंडसे, दीप्ती लेले, वरुण ईनामदार, पूर्वा गोखले, तेजस्विनी लोणारी आणि मंजिरी ओक यांच्यासह अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
News Title: Medha Manjrekar Cancer Recovery Emotional Post






