Pune Railway Station Rename | भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करून ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुणे स्टेशनच्या नावामागचं ऐतिहासिक कारण :
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य पुढे नेण्याचे महान कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं. त्यांनी अटकपासून ते कटकपर्यंत मराठा साम्राज्य विस्तारलं. शनिवारवाडा हे त्या वैभवाचे प्रतीक आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला त्यांच्या नावाने ओळख दिली पाहिजे.”
त्यांनी असंही सांगितलं की, “रेल्वे स्थानकाच्या डागडुजीदरम्यान या शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले पाहिजे. देशभरात विमानतळं आणि स्थानकांवर स्थानिक इतिहासाचं प्रतिबिंब दिसतं, पण पुण्यात ते दिसत नाही.” (Pune Railway Station Rename)
Pune Railway Station Rename | पूर्वीही चर्चेत राहिलेल्या कुलकर्णींची ठाम भूमिका :
मेधा कुलकर्णी काही दिवसांपूर्वी फलटण येथील यशवंत सहकारी बँक घोटाळ्यामुळेही चर्चेत होत्या. त्यांनी बँकेवर खोटं कर्ज दाखवल्याचा आरोप करत ठेवीदारांची फसवणूक झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी करून पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.
पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मागणीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही लक्ष वेधलं जातं आहे. मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीनंतर आता विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरी समाज काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.






