Manikrao Kokate Arrest | सदनिका घोटाळाप्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आजच अटक वॉरंट निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार? :
या प्रकरणाविरोधात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate Arrest) यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, अटक वॉरंट निघाल्यास तातडीने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या वकिलांकडून केला जाऊ शकतो. मात्र, जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम राहिल्याने कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत.
याआधी विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे मोठ्या वादात सापडले होते. त्या वेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. मात्र, अजित पवार यांनी त्यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्रीपद दिले होते. आता मात्र न्यायालयीन शिक्षेमुळे नैतिकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातीलच मंत्र्यावर कारवाई करावी लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती नामुष्कीची बाब ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate Arrest) यांच्यावर तातडीची कारवाई टाळण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांची भूमिका काय राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Manikrao Kokate Arrest | माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली? :
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये माणिकराव कोकाटे यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवली होती. स्वतः माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी मुख्यमंत्री कोट्यातून या सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करण्यात आली होती.
प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेले अपीलही फेटाळले गेल्याने आता त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.






