Malegaon Factory Election Result | बारामतीच्या राजकीय रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मतमोजणी सुरू असतानाच क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे सर्वच पॅनेल्समधील उमेदवारांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनल यांच्यात थेट लढत पाहायला मिळतेय. अजित पवार स्वतः ब वर्ग गटातून निवडून आले असून त्यांनी 91 पैकी 91 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र इतर गटांमध्ये चित्र गोंधळाचे दिसून येत आहे. (Malegaon Factory Election Result)
पॅनेल टू पॅनेल मतदान फसले, मतदारांनी दिला वेगळा कौल? :
अजित पवारांनी मतदारांना पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक मतदारांनी एका पॅनेलच्या काही उमेदवारांना आणि दुसऱ्या पॅनेलच्या काही उमेदवारांना मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे याला ‘क्रॉस व्होटिंग’ म्हटलं जात असून, यामुळे पॅनेलचे संख्याबळ कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
माळेगाव, सांगवी आणि पणदरे या गटांमध्ये क्रॉस व्होटिंगच्या घटनांचा प्रभाव स्पष्ट जाणवत आहे. मतपत्रिकांची छाननी सुरू असून, यावरून क्रॉस व्होटिंगचे प्रमाण आणि परिणाम स्पष्ट होणार आहे. (Malegaon Factory Election Result)
Malegaon Factory Election Result | नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड :
या निवडणुकीत एकूण 90 उमेदवार रिंगणात असून, 21 संचालक निवडले जाणार आहेत. निळकंठेश्वर, सहकार बचाव, बळीराजा बचाव आणि कष्टकरी शेतकरी अशी चार प्रमुख पॅनेल्स लढत आहेत. या निवडणुकीला अजित पवारांनी प्रतिष्ठेची लढत मानले असून, स्वतः निवडणूक लढवून नेतृत्व स्वीकारले आहे.
सध्या ब वर्ग गटातील निकालच जाहीर झाला असला तरी पुढील गटांतील निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंगचा फटका नक्की कोणाला बसतो आणि कोणाचे बस्तान हलते, हे लवकरच स्पष्ट होईल.






