Anant Garje | डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असल्याने या घटनेची चर्चा अधिकच वाढली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचे पीए असलेल्या अनंत गर्जेचे फेब्रुवारी 2025 मध्ये गौरीसोबत लग्न झाले होते. काही महिन्यांतच गौरीने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. घर शिफ्ट करताना तिला पतीच्या जुन्या प्रेयसीच्या गर्भपाताशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर आली आणि याच मुद्द्यावरून वाद वाढत गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
या प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीने अखेर वरळी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. गौरीला घरात सापडलेल्या गर्भपाताच्या कागदपत्रांबद्दल तिला कोणतीही माहिती नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. “२०२२ नंतर माझा आणि अनंतचा कोणताही संबंध नव्हता,” असेही तिने पोलिसांना सांगितले.
जुन्या प्रेयसीचा निवेदन आणि वादग्रस्त कागदपत्रांचा मुद्दा :
गौरीला सापडलेल्या पेपरमध्ये एका महिलेच्या गर्भपाताची नोंद होती आणि त्या दस्तऐवजावर नवऱ्याचे नाव ‘अनंत गर्जे’ (Anant Garje) असल्याचे दिसून आले. हे कागद मिळाल्यानंतर दाम्पत्यात वाद वाढल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. “बीडीडी चाळीतून टॉवरमध्ये शिफ्ट करताना पेपर्स आढळले आणि त्यातूनच वाद तीव्र झाले,” अशी माहिती त्यांनी दिली होती.
या प्रकरणात पोलिसांनी अनेक बाजूने तपास वाढवला असून जुन्या प्रेयसीचा जबाब हा तपासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तिच्या निवेदनामुळे कागदपत्रांच्या सत्यतेबाबत आणि त्यांचा गौरीच्या निर्णयावर झालेल्या परिणामाबाबत नवी बाजू समोर येणार आहे.
Anant Garje | अनंत गर्जेच्या जखमा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासात जोडले :
गौरीने (Gauri Palve Case) आत्महत्या केल्यानंतर अनंत गर्जेने खिडकीतून घरात प्रवेश केला तेव्हा त्याला किरकोळ जखमा झाल्याचे समोर आले. नंतर तो गौरीला पोतदार रुग्णालयात घेऊन गेला, मात्र तिला मृत घोषित होताच त्याने स्वतःलाच मारून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तसेच घरातील खिडकीला बसवलेल्या जाळ्यांबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
या घटनांमुळे अनंतच्या वागणुकीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पोलिस त्याच्या जखमा, हालचाली आणि मानसिक स्थिती यांचा सखोल तपास करत आहेत.
मानसशास्त्रीय तपासणी आणि पोलिसांची पुढील कारवाई :
प्रकरणातील विचित्र घडामोडी लक्षात घेऊन अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. वैज्ञानिक तज्ञांच्या मदतीने तपास केला जाणार असून त्याची पॉलीग्राफ टेस्टही आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोपी अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गौरी पालवे आत्महत्या प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे नागरिक आणि सोशल मीडियात हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. पुढील तपासात कोणते नवे पुरावे समोर येतात आणि गर्भपाताच्या पेपरचे नेमके सत्य काय आहे, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






