शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अडचणीत; ‘या’ कारणास्तव गुन्हा दाखल

On: December 2, 2025 4:21 PM
Santosh Bangar
---Advertisement---

Santosh Bangar | कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मोठा वाद ओढवून घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मतदान प्रक्रियेचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप होत आहे. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, आचारसंहितेचे उल्लंघन आणि मतदान केंद्रातील वर्तन या सर्वांमुळे त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. अखेर या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बांगर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मंगळवारी हिंगोलीतील कळमनुरी येथील मतदान केंद्र क्रमांक ३ वर हा प्रकार घडला. संतोष बांगर मतदानाला पोहोचताच त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएम मशीनवर कोणते बटण दाबावे, याबाबत सूचना दिली. त्याचवेळी मतदान केंद्रात घोषणाबाजी करत “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो” तसेच “एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” असे जोरात नारे दिले. या कृतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि त्यानंतर निंदा, टीका आणि कारवाईची मागणी वाढली.

मतदान केंद्रात नियमभंगाचे आरोप :

मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मतदाराला थेट मतदानाची दिशा दाखवणे आणि मोबाईल फोनचा वापर करणे या सर्व कृती आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानल्या जातात. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाची गोपनीयता अबाधित ठेवणे हे प्रत्येक उमेदवार आणि नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मतदानाच्या या मूलभूत नियमांचे जाहीर उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. गोपनीयतेच्या भंगाचा आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा नोंदवला जाईल, अशी प्राथमिक माहिती अधिकारी यांनी दिली होती. अखेर चौकशीत नियमभंग स्पष्ट झाल्यानंतर आज हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू आहे.

Santosh Bangar | फडणवीसांचा संतोष बांगरांवर रोष :

या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दांत सुनावले. मतदान हा लोकशाहीचा पवित्र उत्सव असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. आपण मतदान केंद्रात कसे वागतो, कोणता संदेश देतो याचा विचार केला पाहिजे.” त्यांच्या या प्रतिक्रियेने संतोष बांगर यांच्यावरील दबाव आणखी वाढल्याचे दिसते.

या गुन्ह्यामुळे पुढील काळात राजकीय पातळीवर काय परिणाम होतील हे पाहावे लागेल. कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या वातावरणात होत असताना या घटनेमुळे शिंदे गटावर टीकास्त्रांचा भडीमार सुरू झाला आहे. बांगर यांना यापुढे निवडणूक आयोगासमोर, कायद्याच्या चौकटीत आणि राजकीय पटलावर उत्तर द्यावे लागणार आहे.

News Title: Big Setback for MLA Santosh Bangar: Case Filed for Violating Voting Secrecy in Hingoli

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now