Team India | आगामी आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या टी-20 संघामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. निवड समितीने घेतलेल्या काही धाडसी निर्णयांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संघाच्या नेतृत्वापासून ते खेळाडूंच्या निवडीपर्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्यामध्ये नव्या चेहऱ्यांनाही मोठी संधी देण्यात आली आहे.
सूर्यकुमार बाहेर, अय्यरकडे नेतृत्वाची धुरा :
भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला या मालिकेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 52 सामन्यांपैकी तब्बल 42 सामने जिंकले होते. तसेच टी-20 विश्वचषक आणि आशिया चषक यांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्येही यश मिळवले होते.
विशेष म्हणजे कर्णधार म्हणून त्याने एकही मालिका गमावली नव्हती. त्यामुळे त्याला थेट संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाने क्रिकेटप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, या बदलामुळे भारतीय टी-20 संघात नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवड समितीच्या या निर्णयामुळे संघाच्या भविष्यातील रणनीतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Team India | श्रेयसची बढती, वैभवला मोठी संधी :
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे आता भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय करारातून बाहेर पडलेल्या श्रेयसने आपल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. 2024 मध्ये त्याने आयपीएल (IPL) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) जिंकली होती, तर 2025 च्या आयपीएल अंतिम फेरीतही आपल्या संघाला पोहोचवले होते. वनडे संघाच्या उपकर्णधारपदानंतर आता टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने त्याचे भारतीय संघातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.
याचबरोबर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याची भारतीय संघात निवड करून बीसीसीआयने भविष्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. आयपीएल 2026 मध्ये वैभवने 16 सामन्यांत 776 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याने हंगामात विक्रमी 72 षटकार ठोकले असून त्याचा स्ट्राइक रेट 237.30 इतका प्रभावी राहिला. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर त्याला थेट आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले असून आता त्याच्याकडे जागतिक स्तरावर स्वतःची छाप पाडण्याची मोठी संधी असणार आहे.






