Phaltan Doctor Death Case | साताऱ्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. बीड जिल्ह्यातील या तरुणी डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तळहातावरच सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख होता. या प्रकरणानंतर पोलिस खात्यात मोठ्या हालचाली झाल्या असून, अखेर बदनेवर सर्वात कठोर कारवाई करण्यात आली आहे.
PSI गोपाळ बदनेची सेवा संपुष्टात :
फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI गोपाळ बदनेला (Phaltan Doctor Death Case) आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली असून, बदनेच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आधीच या प्रकरणातील नाव उजेडात आल्यानंतर बदनेला निलंबित करण्यात आले होते, परंतु आता त्याच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून चौकशी सुरु आहे.
या आत्महत्येच्या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्यात ती म्हणाली होती – “माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने जबाबदार आहे. त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर यांनीही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.” या खुलाशानंतर संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता.
Phaltan Doctor Death Case | इतर महिलांनाही त्रास देत होता PSI बदने :
या प्रकरणानंतर चौकशीत बदनेचे इतरही अनेक गैरप्रकार उघड झाले आहेत. फलटण परिसरात त्याने इतर काही महिलांनाही छळल्याचे, तसेच त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केल्याचे आरोप समोर आले आहेत. स्थानिक महिलांनी दिलेल्या तक्रारींनुसार बदने अनेकदा महिलांची छेड काढायचा, तसेच डोळा मारून अपमानास्पद वर्तन करायचा. या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलिस विभागाने घेतला.
गोपाळ बदने (Gopal Badane) हा गेल्या दोन वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याआधी तो बरड पोलीस ठाण्यात बदलीवर होता. बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी आहे. तो विवाहित असून, त्याच्या वर्तणुकीमुळे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाने केवळ पोलिस दलात नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातही मोठी खळबळ माजवली आहे. एका तरुण डॉक्टरने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्य सरकार आणि पोलिस विभागाने अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.






