Maharashtra Weather | महाराष्ट्रात हवामानात अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतीपिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)
विदर्भात गारपीट आणि यलो-ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे. या भागात वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते जोरदार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
या भागात अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.
उर्वरित महाराष्ट्रात हवामान स्थिती
मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पूरक हवामान तयार होत आहे. (Maharashtra Weather)
तसेच, केंद्रीय हवामान विभागानेही देशाच्या मध्य व पूर्व भागांतील काही राज्यांसाठी 20 ते 23 मार्चदरम्यान ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि पावसाचा समावेश आहे. उत्तर पश्चिम भारतात कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Title : Maharashtra weather update Unseasonal Rain alert









