Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. कधी थंडी तर कधी उष्णता, तर काही भागांत अचानक ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील काही तासांत ढगाळ हवामान आणि धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जानेवारी महिना असूनही अपेक्षित कडाक्याची थंडी जाणवत नाही. डिसेंबरच्या तुलनेत यंदा थंडी कमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सकाळच्या वेळी थोडासा गारवा जाणवतो, मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढते. या अचानक बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, तसेच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यातील तापमानात मोठी तफावत :
देशातील नीचांकी तापमान पंजाबमधील भटिंडा येथे 0.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रात धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तर निफाड येथे कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या आकडेवारीवरून राज्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे.
आज मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुक्याचा अनुभव येऊ शकतो, तर दुपारनंतर हवामान काही प्रमाणात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update | आरोग्यावर परिणाम, प्रदूषणात वाढ :
राज्यातील हवामानातील या चढउताराचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. विशेषतः वायू प्रदूषणात वाढ झाल्याने दम्याचे रुग्ण, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे संबंधित विभागांना नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. (Maharashtra Weather Update)
देशातील अनेक भागांत अजूनही पावसाची स्थिती कायम असून, मॉन्सून संपून अनेक महिने झाले तरीही काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातही वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागांत पाऊस झाला होता. त्या पावसानंतर थंडी कमी झाल्याचे जाणवत असून वातावरण अधिक दमट झाले आहे.
उत्तर भारतात दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात थंडीबरोबरच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून कमाल तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात सध्या हवामान अस्थिर असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच बदलत्या वातावरणानुसार योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






