राज्यातील तापमानात मोठी वाढ! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

On: April 11, 2026 2:20 PM
Nautapa 2026
---Advertisement---

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता हळूहळू काढता पाय घेतला असून राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यातच तापमानात मोठी वाढ होणार असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी आता उष्णतेचे नवे संकट समोर आले आहे. 20 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून बहुतांश भागात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे सूर्याची तीव्रता अधिक जाणवणार आहे.

तापमानात मोठी वाढ; विदर्भात 40 अंश पार होण्याची शक्यता :

सध्या राज्यातील तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. मात्र, पुढील काही दिवसांत तापमानात 5 ते 6 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव परिसरात तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते.

कोकण विभागासाठीही यलो अलर्ट (Heatwave Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update | मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान; काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता :

मध्य महाराष्ट्र भागात हवामानात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसाचा धोका जवळपास संपला आहे. सातारा जिल्हा वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही. घाटमाथ्याच्या काही भागांत मात्र हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणारा ओलावा कमी झाल्यामुळे राज्यात कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे हवेतली आर्द्रता कमी होऊन उकाडा अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि आसाम भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असली तरी त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update News)

सोलापूर, सांगली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. पुढील तीन आठवडे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात उच्च तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

News Title: Maharashtra Weather Update: Heatwave Alert After Unseasonal Rain

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now