Maharashtra Weather | राज्यात सध्या उष्णतेची लाट जाणवत असतानाच हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल
मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानात प्रचंड वाढ झाली असून, रविवारी (Sunday) मुंबईचे तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचले. फेब्रुवारी संपण्याच्या आधीच उष्णतेने जोर धरला होता आणि मार्चमध्ये उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले. एप्रिल व मे महिन्यांत ही उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, पित्त विकार होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळ आणि दक्षिण भारताच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्याच्या वातावरणात बदल होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात मोठे बदल दिसून येतील. 31 मार्चपासून पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यभर पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सोमवार ते बुधवार दरम्यान गडगडाटासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
31 मार्च रोजी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर (Ahilyanagar), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), धाराशिव (Dharashiv) आणि बीड (Beed) या भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या सुरू आहे, आणि पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या हवामान बदलामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Title : Maharashtra Weather Unseasonal Rain Alert 20 Districts






