Maharashtra Weather | राज्यात हवामानात सतत बदल होत असून, एकीकडे उष्णतेचा कहर तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत वातावरणात मोठे बदल होणार असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Weather)
हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल सुरू
हिमालय पर्वतरांगेत नव्यानं सक्रिय झालेल्या पश्चिमेकडील झंझावाताचा परिणाम संपूर्ण भारतभर उमटत आहे. विशेषतः मध्य भारतापासून दक्षिणेकडील राज्यांपर्यंत कमी दाबाच्या नवीन प्रणाली निर्माण झाल्यानं वाऱ्यांच्या दिशांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही प्रकर्षाने जाणवत असून, राज्याच्या पश्चिम, उत्तर, मध्य भागांपासून ते विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत वेगवेगळ्या हवामानाचे स्वरूप पाहायला मिळत आहे.
विदर्भात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत असून, इथं तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. पुढील 24 तासांतही ही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून, राज्यातील मैदानी भागांमध्येही असेच तापमान राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत संध्याकाळनंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता इतर दक्षिण व पश्चिम भागात ढगाळ हवामानासह काही भागांत अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा धोका कायम
नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सात जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलामुळे मोठा फटका बसलेला असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे विशेषतः प्रभावित झाले आहेत. यामध्ये सोलापूर (Solapur), नांदेड (Nanded), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित असल्याचं स्पष्ट झालं आहे. हवामान खात्याने याच आठवड्याच्या अखेरीपर्यंत अवकाळी पावसाचं सावट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather)
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर देखील हवामानात मोठे बदल जाणवत असून, दमट हवामानामुळे वातावरणात अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या भागांत तापमान थोडं घसरलं असलं तरी उष्मा कायम असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानात असेच बदल होण्याची शक्यता आहे.
Title : Maharashtra Weather Heatwave and Unseasonal Rain Trouble






