Maharashtra Weather | महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) दाखल झाला असला तरी अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेची लाट आणि काही भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
11 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा :
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण-गोवा (Konkan-Goa) परिसरात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून त्यापैकी 11 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक (Nashik), अहिल्यानगर (Ahilyanagar), सोलापूर (Solapur), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), बीड (Beed), नांदेड (Nanded), अकोला (Akola), अमरावती (Amravati), गोंदिया (Gondia) आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांतील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Weather | 7 जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज :
कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) या सात जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. संध्याकाळी किंवा रात्री हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. शहराचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांत नैऋत्य मान्सून तेलंगणा (Telangana), ओडिशा (Odisha), झारखंड (Jharkhand), बिहार (Bihar) आणि छत्तीसगड (Chhattisgarh)च्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.






