Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात 19 ऑगस्ट 2026 रोजी हवामानाचा लहरीपणा कायम असून काही भागांत पावसाची प्रतीक्षा असताना काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक स्थिती :
देशातील मान्सूनचा आस सध्या पंजाबमधील फिरोजपूरपासून डेहराडून, शाहजहानपूर, वाराणसी, देहरी, तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र आणि पुढे दिघा मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याचबरोबर पूर्व उत्तर प्रदेश परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता जमिनीवर आले आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालच्या परिसरात सक्रिय असलेली ही हवामान प्रणाली ताशी सुमारे 10 किलोमीटर वेगाने वायव्य दिशेकडे पुढे सरकत आहे. ही प्रणाली झारखंडमधील हजारीबागपासून जवळपास 50 किलोमीटर पूर्वेला, रांचीपासून 80 किलोमीटर ईशान्येला आणि बिहारमधील गयापासून सुमारे 130 किलोमीटर आग्नेय दिशेला केंद्रित होती. आज या प्रणालीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Alert | सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट; तापमानातही फरक :
गेल्या 24 तासांच्या कालावधीत महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय तफावत दिसून आली. मंगळवारी सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच कालावधीत महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी 17.8 अंश सेल्सिअस तापमान होते. पावसाच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे 80 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला.
आजच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव तसेच लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांतील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे महत्त्व आहे.








