SSC HSC Board Exam | इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2025 पासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ताण वाढताना दिसत असला, तरी शिक्षण तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे. बोर्डाच्या नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयानुसार किमान गुणांची आवश्यकता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची भीती बाळगण्याचे कारण नाही. (SSC HSC Board Exam)
भाषिक विषयांमध्ये फक्त २५ गुण मिळवूनही होणार पास :
नव्या नियमांनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या त्रिभाषा सूत्रात (मराठी, हिंदी, इंग्रजी) एकूण १०५ गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या तिन्ही विषयांपैकी कोणत्याही एका विषयात २५ गुण मिळाले आणि एकूण गुण १०५ झाले, तरी विद्यार्थी उत्तीर्ण (Pass) मानला जाणार आहे.
तर गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांसाठी एकत्रित ७० गुणांची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थी जर या दोन विषयांमध्ये एकूण ७० गुण मिळवले, तर तो नापास ठरणार नाही. या नियमामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
SSC HSC Board Exam | परीक्षा पारदर्शक होणार :
हवामान विभागाच्या निर्देशानुसार सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. मात्र, परीक्षा अतिशय कडक होणार नाही, तर पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने घेतली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ताण न घेता नियोजनबद्ध अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. (SSC HSC Board Exam)
अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि ताणामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, पण यावर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठेवण्यात आले आहे. वस्तुनिष्ठ, उताऱ्यावर आधारित आणि निबंधात्मक प्रश्नांचा समतोल ठेवून विद्यार्थ्यांना सहज उत्तरे देता येतील, अशी रचना तयार करण्यात आली आहे.
मुख्याध्यापक संघाचा विद्यार्थ्यांना संदेश :
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोणताही ताण घेऊ नये. प्रश्नपत्रिकांचा सराव आणि वेळेचे नियोजन केल्यास उत्तीर्ण होणे सोपे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, यावर्षीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिक सुलभ करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पालकांनीही सतत अभ्यासाचा ताण न देता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






