Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह घाटमाथ्याच्या भागांत पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले आहेत. (Maharashtra Rain Alert)
विदर्भातील जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच पावसाने धुवाधार हजेरी लावली आहे. काही भागांत सरीसरीने पाऊस पडत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातही पावसाची रिपरिप सुरु असून हवामान ढगाळ आहे.
हवामान विभागाने आज (२३ जुलै) विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तर उद्या (२४ जुलै) चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे आज व उद्या दोन्ही दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Alert)
Maharashtra Rain Alert | तीन दिवसांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा अलर्ट :
२३ जुलै :
ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे घाटमाथा
यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
२४ जुलै :
ऑरेंज अलर्ट – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट – मुंबई, पालघर, नाशिक, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा
२५ जुलै :
ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, संपूर्ण विदर्भ, हिंगोली, नांदेड
दरम्यान, वैनगंगा खोऱ्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून सुमारे ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संजय सरोवर व धापेवाडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.






