नागरिकांनो सतर्क राहा! राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या भागाला रेड अलर्ट

On: July 24, 2026 11:14 AM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | मान्सूनचा जोर पुन्हा वाढल्याने राज्यातील अनेक भागांसाठी पुढील दोन ते तीन दिवसांचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाने पुणे (Pune) घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विविध भागांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्टही लागू करण्यात आले आहेत.

राज्यभर पावसाचा जोर वाढणार :

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्याचबरोबर पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad), नाशिक (Nashik) घाटमाथा आणि सातारा (Satara) घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) तसेच कोल्हापूर (Kolhapur) घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील जैसलमेरपासून कोटा, गुना, दामोह, दाल्तोगंज मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. याशिवाय ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि मणिपूरपर्यंत 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर परस्परविरोधी वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे. आग्नेय राजस्थान आणि मध्य प्रदेश परिसरात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला अधिक पोषक वातावरण तयार झाले आहे.

Maharashtra Rain Alert | जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज :

सततच्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली असून बहुतांश भागांत तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत जळगाव (Jalgaon) येथे राज्यातील सर्वाधिक 29.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे नीचांकी 17.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाटमाथ्यातील ताम्हिणी (Tamhini) येथे सर्वाधिक 280 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट लागू आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule), जळगाव आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून नंदुरबार (Nandurbar) आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

News Title: Maharashtra Rain Alert for Next Three Days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now