Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः 28 आणि 29 जुलै रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भासाठी अतिवृष्टीचा इशारा :
गेल्या काही दिवसांत विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, आता परिस्थिती पुन्हा बदलत असून 28 आणि 29 जुलैदरम्यान विदर्भातील काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळू शकतात. पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी आणि भंडारा, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Rain Alert | रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; नद्या दुथडी भरून वाहताहेत
1 जून ते 27 जुलै या कालावधीत विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये मिळून सरासरी 26 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. जुलैमध्ये निर्माण झालेली ही कमतरता आगामी पावसामुळे काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत झालेली संपूर्ण पावसाची तूट भरून काढण्यासाठी हा पाऊस पुरेसा ठरेलच, अशी शक्यता कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांचा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून वाहणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या दिवसापासून रत्नागिरीत पावसाची संततधार सुरू असून त्याचा परिणाम नदीपात्रांवरही दिसून येत आहे. खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्टी आणि रत्नागिरीतील काजळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील 48 तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






