Maharashtra Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढू लागला असून पुढील 24 तास अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी 5 जुलैसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा धोका :
भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, राज्यातील पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या पार्श्वभूमीवर पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि सातारा (Satara) या पाच ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला असून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या घाटमाथा भागात ऑरेंज अलर्ट लागू आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Alert | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठीही सतर्कतेचा इशारा :
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बीड (Beed), लातूर (Latur) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिकच्या घाटमाथा भागासाठी मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट लागू आहे. जळगाव (Jalgaon) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur), वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अकोला (Akola), बुलढाणा (Buldhana), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.






