महाराष्ट्रात पावसाचा इशारा; ‘हे’ 17 जिल्हे अलर्टवर

On: July 9, 2026 12:21 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, घाटमाथा तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने 9 जुलैसाठी 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा :

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. विशेषतः कोकण पट्टा, घाटमाथा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत असून काही भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे.

कोकण विभागातील पालघर (Palghar), ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून तेथील नागरिकांनाही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज असल्याने या सर्व जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert | पुणे-सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट :

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी पुणे आणि सातारा घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Rain Alert)

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या भागात अतिवृष्टीचा इशारा नसला तरी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मात्र चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. प्रशासनाने पूरप्रवण भाग, नदीकाठची गावे आणि सखल क्षेत्रांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आगामी काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

News Title: Maharashtra Rain Alert for 17 Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now