‘माझ्या बापाला वाचवायचंय…’; अरबाज शेखचा रडून मदतीचा टाहो, रुग्णालयावर लुटीचा गंभीर आरोप

On: July 9, 2026 11:10 AM
Arbaz Shaikh Sairat
---Advertisement---

Arbaz Shaikh | आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा मराठी अभिनेता अरबाज शेख (Arbaz Shaikh) सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. त्याचे वडील ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) आणि हृदयाच्या विकाराने ग्रस्त असून त्यांच्या उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे हतबल झालेल्या अरबाजने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक होत आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मात्र, हे आवाहन करतानाच त्याने सोलापूरमधील नामांकित ‘नोबल हॉस्पिटल’च्या (Noble Hospital Solapur) कारभारावर आणि तिथल्या औषध खरेदीच्या सक्तीवर गंभीर आरोप करत रुग्णांची कशी लूट होते, याचा पाढाच वाचला आहे.

“४० हजारांची औषधे बाहेर अर्ध्या किमतीत”; अरबाजने मांडली व्यथा

अरबाज शेखने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलबाहेर उभे राहून आपली व्यथा मांडली:

“पप्पांना गंभीर आजार असल्याने आम्ही त्यांना नोबल हॉस्पिटलमध्ये हलवले. सुरुवातीला १० हजार रुपये डिपॉझिट भरल्यानंतर डॉक्टरांनी औषधांची चिठ्ठी दिली. मी ती औषधे बाहेरून आणू का, असे विचारले असता रुग्णालय प्रशासनाने साफ नकार दिला आणि रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषधे व इंजेक्शन्स घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मी तिथून औषधे घेतली तर त्यांचे बिल तब्बल ४० हजार रुपयांच्या वर गेले. तिच औषधे बाहेर जवळपास अर्ध्या किमतीत मिळत होती. या उघड लुटीमुळे आणि घाण अनुभवामुळे मला माझ्या वडिलांना तिथून दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करावे लागले. मला काही करून माझ्या वडिलांना वाचवायचे आहे, कृपया मला मदत करा.”

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन?

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांना कडक ताकीद दिली होती. “रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने अजिबात बंधनकारक नाही. औषधे कुठून घ्यायची, हा संपूर्णपणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मूलभूत अधिकार व वैयक्तिक निवड (Choice) आहे. कोणतीही संस्था कोणावरही अशी सक्ती करू शकत नाही,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले होते. तसेच आदेश मोडून सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर अरबाज शेखसोबत घडलेल्या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी या रुग्णालयावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रुग्णालयाचा दावा: “सर्व आरोप खोटे”

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी आपली बाजू मांडताना अरबाजचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अरबाज शेख यांचे वडील अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आले होते. ते केवळ काही तासच आमच्याकडे दाखल होते आणि त्यांना तातडीने आवश्यक असणारीच औषधे देण्यात आली. आमच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा सक्ती करण्यात आली नव्हती. अरबाजने हे आरोप कोणत्या उद्देशाने केले आहेत, याची आम्हाला कल्पना नाही,” असा दावा डॉ. सय्यद यांनी फोनवरून केला आहे; मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

News Title: Arbaz Shaikh Sairat Actor Father Hospital Fraud FDA Tukaram Mundhe

Join WhatsApp Group

Join Now