राज्यात १४५ नवे उड्डाणपूल होणार; गडकरी-फडणवीसांचा मास्टरप्लॅन

On: July 13, 2026 1:34 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra | महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. पुढील तीन वर्षांत ‘महारेल’च्या माध्यमातून 145 नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दळणवळण अधिक सक्षम होण्याबरोबरच विकासकामांना गती आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

नागपुरातून प्रकल्पांचा शुभारंभ, 145 उड्डाणपुलांना मंजुरी :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत नागपूर (Nagpur) येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Maharail), महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) आणि रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways) यांच्या संयुक्त विद्यमाने चार रोड ओव्हर ब्रिज (ROB), चार अंडरपास (Subway) आणि एका रोड अंडरब्रिज (RUB) चे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात राज्यातील रेल्वे फाटकमुक्तीच्या व्यापक आराखड्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उर्वरित रेल्वे फाटकांवर टप्प्याटप्प्याने उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways) यांचे सहकार्य मिळत आहे. ‘महारेल’च्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Maharashtra | महारेलच्या माध्यमातून विकासाला वेग :

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील रेल्वेसंबंधित पायाभूत सुविधा जलदगतीने विकसित करण्यासाठी ‘महारेल’ची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेने आतापर्यंत अनेक जटिल आणि आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात दर्जेदार कामे करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई (Mumbai) सहित राज्यातील विविध भागांमध्ये महारेलने अनेक महत्त्वाची कामे नियोजित वेळेत पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात एकूण 145 उड्डाणपुलांचा समावेश असून त्यापैकी 65 पूल रेल्वे फाटकांवर तर उर्वरित 80 इतर ठिकाणी उभारले जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या दशकात नागपूर शहराचा झालेला वेगवान विकास अधोरेखित करत, आगामी काळात विदर्भ (Vidarbha) आणि संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

News Title: Maharashtra Plans 145 New Flyovers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now