Local Body Elections | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज महत्त्वाचा टप्पा पार पडत आहे. राज्यभरातील 262 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अनेक वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Local Body Elections)
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, आज पहाटेपासून पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायती येथे मतदान प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल 6.3 लाख नोंदणीकृत मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार असून एकूण 6,70% सदस्य आणि 264 अध्यक्षांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिक जिल्ह्यातही 11 नगरपरिषदांमध्ये मतदान सुरू असून 416 मतदान केंद्रांवर प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मतदानाला जोर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड या सहा नगरपरिषदांमध्ये सकाळपासूनच मतदानाचा ओघ वाढलेला दिसला. विशेषतः सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची, तर पैठणमध्ये खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Local Body Elections)
धुळे जिल्ह्यात शिरपूर वरवाडे, पिंपळनेर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायती येथे मतदान सुरू आहे. तीन नगराध्यक्ष पदांसाठी दहा उमेदवार रिंगणात असून स्थानिक राजकारणात तिहेरी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. संवेदनशील बूथवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांततेत मतदान व्हावे याची विशेष काळजी घेतली जात आहे.
Local Body Elections | अहिल्यानगर, बदलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही चुरशीची लढत :
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात 12 पैकी 8 नगरपरिषदांसाठी मतदान होत असून चार ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. बदलापूर नगरपरिषदेत 43 जागांसाठी मतदानाचा क्रम सुरू आहे. येथे शिवसेना व भाजप यांच्यात सरळ लढत असून कोणाचा झेंडा फडकेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गांधी चौक परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसत आहेत.
सटाणा (Satana) नगरपरिषदेत 22 जागांसाठी 74 उमेदवार रिंगणात असून भाजप, शिंदे गट आणि बंडखोर गट यांच्यात त्रिकोणी लढत निर्माण झाली आहे. यामुळे मतदार कोणाच्या बाजूने झुकतात यावर निकाल अवलंबून राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यातही आठ नगरपालिकांसाठी मतदान सुरू असून आठ नगराध्यक्ष आणि 183 सदस्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. भूम, परंडा, कळंब, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम आणि उमरगा येथे मतदान सुरू आहे.
धाराशिव आणि उमरगा येथील काही जागांवर मतदान स्थगित असून 20 डिसेंबर रोजी प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात तब्बल दोन लाख 43 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांमध्ये आमदार तानाजी सावंत, राणा जगजीतसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे या जिल्ह्याचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.






