अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये! राज्यात 10 लाख एकर शेती पाण्याखाली, वॉर रूममधून दिले महत्त्वाचे आदेश

On: August 19, 2025 11:39 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत पुराचा फटका बसला आहे. गावोगाव पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अजित पवार यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पाहणी :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून थेट पूरस्थितीचा आढावा घेतला. मिठी नदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या टप्प्यावर गेल्याने प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. अजितदादांनी सांगितले की, दर तीन तासांनी हवामान खात्याकडून अहवाल मिळत असून, परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. गरज भासल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. (Maharashtra Rain Alert)

संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत तर घरं आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू केले जाईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

Maharashtra Rain Alert | सरकारची तयारी व उपाययोजना :

अजित पवार यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाला धरणातून पाणी सोडताना विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच कॅचमेंट भागातील पाण्याचा ओघ वाढल्याने शेजारील राज्यांसोबत समन्वय साधला जात आहे. पाणी खाली सोडलं नाही तर फुगवटा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयुक्त नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Rain Alert)

मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची बैठक :

आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली असून, दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर असून, स्थानिक पातळीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अजित पवार यांनी राज्यातील जनतेला धीर देत सांगितले की, कोणीही घाबरू नये, परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत पोहोचवली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

News Title: Maharashtra Heavy Rain: 10 Lakh Acres of Farmland Submerged, Ajit Pawar Reviews Flood Situation in War Room

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now