Maharashtra Heatwave Alert | राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळत असून काही भागांमध्ये प्रचंड उष्णता तर काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट :
महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी तीव्र होत चालली असून अमरावती (Amravati), अकोला (Akola) आणि वर्धा (Wardha) या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधी या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गडचिरोली (Gadchiroli), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाली असून अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी लस्सी, लिंबूपाणी आणि थंड पेयांच्या दुकानांकडे वळताना दिसत आहेत.
Maharashtra Heatwave Alert | काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज :
राज्यातील काही भागांमध्ये मात्र पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. रत्नागिरी (Ratnagiri), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच अहिल्यानगर (Ahilyanagar), सांगली (Sangli), ठाणे (Thane), रायगड (Raigad), बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊसही होऊ शकतो.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून नागरिकांना प्रखर उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






