Maharashtra Heatstroke | राज्यात तापमानाचा पारा चढत असल्यामुळे उष्माघाताच्या (Heatstroke) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात उष्माघातामुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
उष्माघात रुग्णसंख्या आणि प्रादेशिक स्थिती-
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात राज्यात उष्माघाताचे (Maharashtra Heatstroke) १०२ रुग्ण आढळले होते आणि दोन संशयित मृत्यूंची नोंद झाली होती, हे मृत्यू नागपूर (Nagpur) परिसरातील होते. एप्रिल महिन्यात ३० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, याच महिन्यात आणखी तीन संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, नागपूर विभागात मागील दोन महिन्यांत उष्माघाताचे १०१ रुग्ण आढळले आहेत आणि आकडेवारीनुसार मार्चपेक्षा एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मार्च महिन्यात उष्माघाताच्या तीन रुग्णांची नोंद केली होती. एप्रिल महिन्यातही संशयित रुग्णांची आणि मृत्यूंची नोंद झाली आहे. याउलट, मुंबईमध्ये (Mumbai) आतापर्यंत केवळ एकाच उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झाली असल्याची माहिती आहे.
उष्माघाताची लक्षणे आणि आरोग्य विभागाचा सल्ला
वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणांनुसार, उष्माघाताच्या (Maharashtra Heatstroke) तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने अंगदुखी, मळमळणे किंवा उलट्या होणे, चक्कर येणे, दम लागणे आणि अंगावर उष्णतेमुळे पुरळ येणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. नागरिकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ‘कडक उन्हामध्ये गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी,’ असा सल्ला आरोग्यसेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर (Dr. Kailas Baviskar) यांनी दिला आहे.






