DA Hike | महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कार्यरत तसेच निवृत्त दोन्ही गटांना दिलासा मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या घोषणेमुळे शासकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. (Maharashtra DA Hike)
महागाई भत्ता 53% वरून 55% :
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, महागाई भत्ता सध्याच्या 53% वरून 55% करण्यात आला आहे. ही वाढ केवळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही लागू होणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात थेट वाढ होणार आहे.
या वाढीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतच्या आठ महिन्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना एकत्रित मिळणार आहे. या फरकाच्या रकमेचा लाभ निवृत्ती वेतनधारकांनाही होणार असल्याने, पेन्शनधारकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे.
DA Hike | लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा :
महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. महागाई भत्त्यातील ही वाढ त्यांना महागाईच्या वाढत्या ओझ्यातून काहीसा दिलासा देणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर खर्च लक्षात घेता हा निर्णय वेळेवर घेतल्याचे मानले जात आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या आधी घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी सारख्या आगामी सणांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हाती जास्त रक्कम उपलब्ध होणार आहे. यामुळे खरेदी-विक्रीत वाढ होण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.






