महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू

On: December 23, 2025 11:14 AM
BMC Election 2026
---Advertisement---

Maharashtra Election News | मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्यामुळे राज्यभरात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडसह प्रमुख शहरांमध्ये इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून युती आणि जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये आघाडी अथवा युतीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने पहिल्याच दिवशी किती उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने बंडखोरीची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

नागपूरमध्ये झोन कार्यालयांत अर्ज दाखल करण्याची सुविधा :

नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत संबंधित झोन कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. शहरातील 38 प्रभाग 10 झोनमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या (Pune Mahapalika) निवडणुकीसाठीही आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि उमेदवार निश्चितीवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असतानाच निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत प्रारंभ झाला आहे. पुणे महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

Maharashtra Election News | भाजपची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता :

मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्णय असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजपकडून प्रभागनिहाय उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी किमान 80 उमेदवारांची असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सध्या सावध भूमिका घेतली जात आहे. जागावाटपात योग्य न्याय मिळाल्यास सहभागी व्हावे, अन्यथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत राहावे, अशा सूचना प्रदेश काँग्रेसकडून शहर पातळीवर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार तीन दिवसांपासून पुण्यात, पक्षप्रवेशांना वेग :

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पक्षप्रवेशांचे कार्यक्रम सुरू असून आजही अनेक इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सकाळपासूनच बारामती हॉस्टेलमध्ये गाठीभेटी सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Mahapalika) भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती अंतिम झाल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पुढील काही तासांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या युतीत शिवसेनेने 30 जागांची मागणी केली असून कोणतीही रस्सीखेच केली जाणार नसल्याचेही बारणे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपसोबतची पारंपरिक युती कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

News title : Maharashtra Election News

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now