Maharashtra Bandh | दिल्ली येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला डाव्या आघाडींचाही पाठिंबा मिळाला असून राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलन, चक्काजाम आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही भागांत संमिश्र चित्र पाहायला मिळाले.
राज्यभर आंदोलन, अनेक कार्यकर्ते ताब्यात :
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. ठाणे (Thane) येथील इंदिरानगर (Indiranagar) परिसरात आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील क्रांती चौक (Kranti Chowk) परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही वंचितचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन करण्याच्या तयारीत आहेत.
विरार (Virar) आणि वसई (Vasai) परिसरात आंदोलन सुरू होण्यापूर्वीच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधव (Geeta Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई (Mumbai) प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे (Chetan Ahire) यांनाही विक्रोळी (Vikhroli) पोलिसांनी ताब्यात घेतले. विरार पूर्व (Virar East) रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करूनही पोलिसांनी कारवाई केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Maharashtra Bandh | काही शहरांत बंदचा प्रभाव, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद :
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) तालुक्यात मसा खंडेश्वरी (Masa Khandeshwari) येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत येरमाळा-कळंब (Yermala-Kalamb) मार्गावर चक्काजाम करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यात आला. कोल्हापूर (Kolhapur) शहरात वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरासह ग्रामीण भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिवसा (Tiwasa) आणि दर्यापूर (Daryapur) येथे सकाळपासून अनेक दुकाने बंद होती. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अमरावती शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. एकूणच राज्यातील विविध भागांमध्ये बंदचा प्रभाव वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येत असून काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही शहरांमध्ये जनजीवन नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे.






