Maharashtra Professor Recruitment | राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे. राज्य सरकारने लवकरच हजारो पदांवर प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे नेट-सेट पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चर्चा सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही भरती प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Professor Vacancy Maharashtra)
राज्यातील हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया :
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधान परिषदेत यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. त्यांच्या माहितीनुसार राज्यात सुमारे 5,412 ते 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरकारने ही भरती जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
राज्यात सध्या उच्च शिक्षणासाठी मंजूर असलेल्या सुमारे 31 हजारांहून अधिक पदांपैकी जवळपास 11 हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील कामकाजावर ताण येत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भरती करून ही रिक्तता भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या भरतीमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशा विविध पदांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे रिक्त पदांपैकी बहुतांश पदे ही सहायक प्राध्यापकांच्या श्रेणीत असल्याचेही सांगितले जात आहे.
Maharashtra Professor Recruitment | 400 हून अधिक महाविद्यालयांमध्ये संधी :
राज्यातील प्रमुख विद्यापीठांसह 400 हून अधिक महाविद्यालयांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शैक्षणिक केंद्रांतील महाविद्यालयांनाही या भरतीचा फायदा होणार आहे.
या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली आहे. भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Chandrakant Patil Announcement Professor Vacancy)
दरम्यान या भरतीसाठी उमेदवारांकडे NET, SET किंवा PhD यांसारख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक असेल. निवड प्रक्रिया ऑनलाइन अर्ज, लेखी परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांमधून पार पडणार आहे. तसेच शासनाच्या नियमांनुसार SC, ST, OBC आणि EWS प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद लागू राहणार आहे. सरकारचे उद्दिष्ट येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध करून देण्याचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






