गॅस टंचाईचा राज्यात पहिला बळी; रांगेत उभे असताना माजी सरपंचाचा मृत्यू

On: March 29, 2026 12:29 PM
LPG Shortage
---Advertisement---

LPG Shortage | गेल्या ३० दिवसांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट भारतात जाणवू लागले आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी अनेक भागांत गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. याच टंचाईचा पहिला बळी गेला असून, सिलेंडरसाठी रांगेत थांबलेल्या एका माजी सरपंचाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर (Anvi Mirzapur) येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट (Shankarrao Shirsat) हे यदुराज गॅस एजन्सी (Yaduraj Gas Agency) समोर सिलेंडर मिळवण्यासाठी आपला क्रमांक लावून उभे होते. कडक उन्हाचा तडाखा आणि सिलेंडरसाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. दुर्दैवाने, घटनास्थळीच त्यांचा प्राण गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

राज्यात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. नागरिकांना सिलेंडर बुक केल्यानंतर तो मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. अशा परिस्थितीत रांगेत उभे असताना घडलेल्या या मृत्यूमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्वी मिर्झापूर गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून, गॅस एजन्सीसमोरील गर्दी आणि नियोजनाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार (NCP – Sharadchandra Pawar) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात मुबलक गॅस असल्याचा दावा करणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती पाहावी, असे सांगत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. शिरसाट कुटुंबीयांची सरकारने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिलेंडर बुकिंगनंतर २५ दिवसांनी मिळेल असे सांगणाऱ्या व्यवस्थेवर त्यांनी तीव्र शब्दांत प्रहार केला.

Join WhatsApp Group

Join Now