Ketan Agrawal | पुण्यातील(Pune) लोहगड किल्ल्यावर(Lohagad Fort) घडलेल्या केतन अग्रवाल(Ketan Agrawal) मृत्यू प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेत केतनला दरीत ढकलून ठार मारल्याचा संशय बळावला असून, त्याची होणारी पत्नी सिया गोयल(Siya Goyal) आणि तिचा मित्र चेतन चौधरी(Chetan Choudhari) यांच्यावर संशयाची सुई केंद्रित झाली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी केतनला लोहगडावर जाण्याची इच्छा नव्हती. सिया त्याच्याकडे वारंवार गडावर जाण्याचा आग्रह धरत होती, मात्र तो सतत नकार देत होता. विशेष म्हणजे केतन हा अनुभवी ट्रेकर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याने वारंवार नकार का दिला, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला काहीतरी संशय आला होता का, किंवा घडणाऱ्या घटनेची कुणकुण आधीच लागली होती का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने आखला होता प्लॅन? :
केतनचे वडील विशाल अग्रवाल(Vishal Agrawal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून हा सियाचा वाढदिवस असल्याने त्यापूर्वी प्री-बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याच कारणावरून लोहगडावर जाण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. मात्र या संपूर्ण नियोजनामागे वेगळाच हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केतनने जाण्यास नकार दिल्यानंतरही हा आग्रह थांबला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, सियाने थेट केतनच्या आईशी संपर्क साधला आणि केतनला सोबत पाठवण्यासाठी वारंवार विनंती केली. केतनचा नकार कायम असतानाही त्याच्या आईने सियाचा आग्रह मान्य केला आणि केतनला तिच्यासोबत जाण्यास सांगितले. अखेर आईच्या सांगण्यावरून केतन लोहगडावर जाण्यास तयार झाला. या घडामोडींमुळे या भेटीचे नियोजन आधीपासूनच ठरवून करण्यात आले होते का, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
Ketan Agrawal | हत्येच्या वेळेबाबतही माहिती समोर :
18 जून रोजी सकाळी सुमारे 8 वाजून 20 मिनिटांनी केतन आणि सिया घरातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुमारे पावणे अकराच्या सुमारास लोहगड परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. विशाल अग्रवाल यांच्या दाव्यानुसार, सिया आणि चेतन यांनी एकत्रितपणे केतनवर हल्ला केला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस एखाद्या वस्तूने प्रहार केल्यानंतर त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत केतन जवळपास 400 फूट खोल दरीत कोसळला. गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून आरोपींची भूमिका, नियोजन आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक नव्या खुलाशामुळे हत्याकांडाचे गूढ अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे.






