Lohagad Fort Accident | पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक घटना घडली असून फोटो काढण्याच्या प्रयत्नात २४ वर्षीय तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. केतन विशाल अग्रवाल असे मृत तरुणाचे नाव असून पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस १९ जून रोजी असल्याने तो हा खास क्षण साजरा करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी महाबळेश्वरमध्ये विशेष नियोजनही करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच नियतीने घात केला.
फोटो काढताना तोल गेला
लोहगड किल्ल्यावर फिरत असताना केतन फोटो काढण्यासाठी कड्याच्या जवळ गेला. याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो सुमारे ३५० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. केतनचा विवाह पुढील महिन्यात होणार असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नासाठी जयपूरमधील आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बचावकार्याची शर्थ, पण प्रयत्न अपुरे
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा, वनजीव रक्षक संस्था, ट्रेकर्स आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घनदाट झाडी आणि अवघड भौगोलिक परिस्थितीतून मार्ग काढत बचाव पथकाने केतनला दरीतून बाहेर काढले.
त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
परिसरात शोककळा
केतन हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
News Title: Lohagad Fort Accident Ketan Agarwal Death Pune






