शिलेदार मनसेचे, पराभव भाजपचा! मराठवाड्याच्या राजकारणातील सर्वात मोठी उलथापालथ

On: February 9, 2026 1:50 PM
Latur ZP Election Result
---Advertisement---

Latur ZP Election Result | मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणारा मोठा धक्का लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपाच्या बालेकिल्ल्यात धडक देत अनपेक्षित यश संपादन केले आहे. राज्यभर निकालांची घोषणा सुरू असताना लातूरमधील मनसेच्या या विजयाने सर्वच राजकीय पक्षांना चकित केले आहे.

विशेष म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने लातूर जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे यंदाही भाजप मजबूत स्थितीत असल्याचे चित्र होते. मात्र यावेळी मनसेच्या उमेदवारांनी मैदानात उतरून निवडणुकीचे गणितच बदलून टाकले. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पारंपरिक लढतीत मनसेने थेट हस्तक्षेप करत मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला आहे. (Latur ZP Election Result)

मनसेचा धडाकेबाज विजय :

रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटातून मनसेचे डॉ. सुनील नागरगोजे यांनी निर्णायक विजय मिळवला. तसेच पंचायत समिती गणातून मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे या दोघीही मनसेच्या उमेदवारांनी बाजी मारली. या निकालामुळे लातूरमध्ये मनसेचे ‘इंजिन’ वेगात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मनसेचा हा विजय केवळ तीन जागांपुरता मर्यादित नसून, त्याचा राजकीय अर्थ मोठा मानला जात आहे. मराठवाड्यात आजवर मर्यादित प्रभाव असलेल्या मनसेने थेट भाजपाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करत स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मनसे अधिक आक्रमक भूमिका घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Latur ZP Election Result | भाजपाला धक्का, काँग्रेसचीही चांगली कामगिरी :

या निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचे चित्र होते. अमित देशमुख, संभाजीराव निलंगेकर पाटील आणि अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र मनसेच्या अनपेक्षित कामगिरीमुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसनेही काही ठिकाणी चांगली कामगिरी करत आपली उपस्थिती टिकवून ठेवली आहे.

प्राथमिक निकालानुसार, लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर गटातून काँग्रेसचे महादेव मस्के विजयी झाले, तर भातांगळी गटातून भाजपचे पांडुरंग बालवाड यांनी बाजी मारली. अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शितल खोमणे विजयी ठरल्या. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा गटात अपक्ष उमेदवार धर्मपाल देवशेट्टे यांनी विजय मिळवला असून आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी झाल्या आहेत. (Latur ZP Election Result News)

एकूणच लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असून काँग्रेसने काही प्रमाणात ताकद दाखवली आहे. मात्र या संपूर्ण चित्रात सर्वाधिक चर्चा मनसेच्या ‘सरप्राइज एन्ट्री’ची होत आहे. या विजयामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी निवडणुकांसाठी ही निवडणूक दिशा दर्शवणारी ठरणार आहे.

News Title: Latur ZP Election Results 2026: MNS Breaks BJP Stronghold in Biggest Political Upset in Marathwada

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now