Latur Politics | राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच प्रमुख पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत असून उमेदवार निवड, प्रचाराची दिशा आणि राजकीय रणनीती ठरवली जात आहे. अशा वातावरणात अनेक इच्छुक नेते आणि पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. (Latur Municipal Election 2026)
अशातच लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. लातूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या असून, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. काँग्रेसमधील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
लातूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव आणि पुनीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यांच्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते हरिश्चंद्र जाधव, अशोक देदे तसेच गनिमीकावा संघटनेचे लक्ष्मीकांत जोगदंड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला मात्र बळकटी मिळाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, हे पक्षांतर केवळ व्यक्तीगत निर्णय नसून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील अनुभवी नेते भाजपमध्ये आल्याने प्रचार यंत्रणा अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे.
Latur Politics | लातूर महापालिका निवडणुकीत रंगणार काँग्रेस-भाजप लढत :
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. लातूर महापालिकेच्या 18 प्रभागांतील एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने येत्या काही दिवसांत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latur Municipal Election 2026)
लातूर नगरपरिषदेचे 2011 साली महानगरपालिकेत रूपांतर झाले होते. पहिल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली होती, तर दुसऱ्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
मात्र, अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस काहीशी कमकुवत झाल्याचे चित्र आहे. माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आता लातूरकर आगामी निवडणुकीत कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालतात, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






