Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका असल्यामुळे हजारो महिलांचे दीड हजार रुपयांचे मासिक हफ्ते बंद झाले होते. यामुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली होती. आता यावर दिलासा देणारी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली असून, ई-केवायसीतील (e-KYC error) चूक दुरुस्त करून लाभ पुन्हा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ई-केवायसीतील चूक कशी दुरुस्त करावी? :
राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Boyar) यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री महोदयांच्या लाडकी बहीण योजनेत ( Ladki Bahin Yojana) काही लाभार्थी महिलांचे पैसे ई-केवायसीमधील चुकीमुळे प्रलंबित राहिले होते. या संदर्भात तातडीने बैठक घेऊन अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांच्या माध्यमातून पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांचा हफ्ता थांबला होता, त्यांना लवकरच पुन्हा पैसे मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींनी आपल्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि संपर्क क्रमांक जमा करावा. त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडून माहितीची पडताळणी केली जाईल. क्रॉस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांचा हफ्ता पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Ladki Bahin Yojana | हफ्ता बंद झालेल्यांना मोठा दिलासा :
हफ्ता बंद झाल्यानंतर अनेक महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांसमोर आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत विभागाने राज्यभरातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि ई-केवायसीतील चुका दुरुस्त करून महिलांना पूर्ववत लाभ देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे हजारो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.






