Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे एकत्र मिळाल्यामुळे यावेळी 1,500 रुपये की 3,000 रुपये मिळणार, याबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा :
राज्यातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारकडून 15 जूनपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी 10 जून रोजी राज्य सरकारने 344 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यापूर्वी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिलांना यावेळी मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे एकूण 3,000 रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उपलब्ध माहितीनुसार यावेळी केवळ मे महिन्याचे 1,500 रुपयेच जमा केले जात आहेत. जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये वितरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या महिलांनी यशस्वीरित्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे.
Ladki Bahin Yojana | ई-केवायसीमुळे 80 लाख महिला अपात्र :
लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही. काही महिलांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
सध्या ई-केवायसीची प्रक्रिया बंद करण्यात आली असली तरी ती पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णयाकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.






