Ketan Agarwal Case | केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत असताना आता त्याच्या आणि सिया गोयल (Siya Goyal) यांच्या विवाहपत्रिकेचीही चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या कुंडलीतील 36 पैकी 27 गुण जुळल्यामुळे हे लग्न यशस्वी ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
36 पैकी 27 गुण जुळले, तरी घडली धक्कादायक घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी दोघांच्या जन्मपत्रिकेची तपासणी करण्यात आली होती. ज्योतिषीय गणनेनुसार त्यांच्या कुंडलीतील 36 पैकी 27 गुण जुळले होते. विवाहासाठी हा गुणांचा आकडा शुभ मानला जात असल्याने दोन्ही कुटुंबांनी या नात्याला संमती दिली. पत्रिकेनुसार केतनचा देवगण तर सियाचा मनुष्यगण असल्याचेही नमूद करण्यात आले होते. ज्योतिषाने विवाहासाठी अनुकूल योग असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी साखरपुडा पार पाडला आणि नोव्हेंबर 2026 मध्ये विवाहसोहळा आयोजित करण्याची तयारीही सुरू केली होती.
केतन भविष्यातील वैवाहिक आयुष्याची स्वप्ने पाहत असताना, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सियाचे मन मात्र चेतन चौधरी (Chetan Choudhary) याच्याकडे होते. आरोपानुसार, सियाने केतनसोबत प्रेमाचे नाटक सुरू ठेवत त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचला. तपासात यापूर्वीही त्याच्या जीवावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. अखेर 18 जून रोजी, 19 जूनला असलेल्या केतनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, ट्रेकिंगच्या निमित्ताने त्याला लोहगड (Lohagad Fort) येथे नेण्यात आले. तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या चेतन चौधरीच्या मदतीने निर्जन ठिकाणी नेऊन त्याला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
Ketan Agarwal Case | पोलिस तपासाला वेग, आरोपींचे रिक्रिएशन पूर्ण :
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती सिया आणि चेतन यांच्यातील चॅट, दीर्घकाळ झालेले फोन कॉल आणि इतर तांत्रिक पुरावे लागले. सुरुवातीला अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी तपास जसजसा पुढे सरकला तसतसे हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळावला. या प्रकरणात दोघांविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पोलिस विविध बाजूंनी तपास करत आहेत.
दरम्यान, न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 जून रोजी सिया गोयलला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचे रिक्रिएशन करण्यात आले होते. त्यानंतर चेतन चौधरीलाही लोहगडावर नेऊन पोलिसांनी घटनाक्रमाची पुनर्रचना केली. 18 जून रोजी त्याने परिधान केलेल्या वेशभूषेप्रमाणेच त्याला घटनास्थळी आणण्यात आले. ज्या ठिकाणाहून केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणी पुतळ्याच्या साहाय्याने संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. या तपासातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.






