Ketan Agarwal | पुण्यातील (Pune) तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ला (Lohagad Fort) मर्डर मिस्ट्रीमध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू भासवण्यात आलेल्या या घटनेत आता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण तपासादरम्यान, अग्रवाल आणि गोयल कुटुंबाच्या संबंधांबाबत आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे की, अग्रवाल कुटुंबाने सुरुवातीला सियासोबतच्या या विवाहाचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला होता.
‘गुलबर्गा’ येथे झाली होती पहिली भेट
मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचे लग्न काही मध्यस्थ नातेवाईकांच्या पुढाकाराने निश्चित झाले होते. या दोन्ही कुटुंबांची सर्वात पहिली भेट कर्नाटक मधील गुलबर्गा (Gulbarga) येथे आयोजित एका सामाजिक विवाह सोहळ्यात झाली होती. त्याच ठिकाणी दोन्ही बाजूंच्या पालकांसमोर केतन आणि सियाच्या विवाहाचा प्रस्ताव पहिल्यांदा ठेवण्यात आला होता.
वयाचे कारण पुढे करत प्रस्ताव नाकारला; पण…
ज्या वेळी गुलबर्गा येथे हा प्रस्ताव आला, त्या वेळी सियाचे वय अवघे २० वर्षे होते. सियाच्या याच कमी वयाचे कारण पुढे करत अग्रवाल परिवाराने सुरुवातीला हा विवाह प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला होता. परंतु, त्यानंतरही गोयल कुटुंबाकडून लग्नासाठी सातत्याने आणि वारंवार आग्रह धरण्यात आला. त्यांच्या या आग्रहामुळे अखेर अग्रवाल कुटुंबाने मती बदलली आणि ते या नात्यासाठी तयार झाले.
काही दिवसांतच दोन्ही कुटुंबांच्या संमतीने १९ फेब्रुवारी रोजी केतन आणि सिया यांचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात आणि शाही पद्धतीने पार पडला. त्यानंतर आगामी २५ नोव्हेंबर रोजी राजस्थान येथे त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती, ज्यासाठी तिथले मोठे राजवाडे आणि आलिशान हॉल्सची पाहणी देखील सुरू होती.
कौटुंबिक सहली आणि ‘आंधळा विश्वास’
साखरपुडा संपन्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. गोयल कुटुंबातील सदस्य पुण्यात अग्रवाल यांच्या निवासस्थानी वारंवार येऊ लागले होते. तसेच सिया देखील अग्रवाल कुटुंबाच्या विश्वासाचा भाग बनली होती. ती त्यांच्यासोबत विविध कौटुंबिक सहलींवर (Family Trips) जाऊ लागली होती. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी अत्यंत उद्विग्नतेने सांगितले की, “आम्ही सुरुवातीपासूनच तिच्यावर अगदी आंधळा विश्वास ठेवला, आमच्या मनात तिच्या वर्तनाबद्दल कधीच कुठला संशय आला नाही. पण तिने याचा इतका भयानक गैरफायदा घेतला.”
लोहगड किल्ल्यावरच जाण्याचा का धरत होती हट्ट?
पोलीस तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सियाला केतनसोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण हा विवाह तिच्या आणि चेतन चौधरीच्या प्रेमसंबंधांच्या आड येत होता. हा विवाह मोडण्यासाठी त्यांनी थेट केतनलाच कायमचे वाटेतून हटवण्याची (हत्या करण्याची) भयानक योजना आखली होती.
नाते निश्चित झाल्यापासूनच सियाने या पूर्वनियोजित कटानुसार केतनला सतत फोन करून बाहेर फिरण्यासाठी नेण्याची विनवणी करण्यास सुरुवात केली होती. केतन आपल्या भावी पत्नीच्या इच्छेचा मान राखत नेहमीच तिचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करायचा. सिया नेहमी मुद्दामहून लोहगड किल्ल्यावरच फिरण्यासाठी जाण्याचा हट्ट करायची, जेणेकरून तिथे तिला केतनला दरीत ढकलण्याची संधी मिळेल. याच हट्टामुळे ते घटनेपूर्वी दोन वेळा तिथे जाऊन आले होते आणि तिसऱ्या प्रयत्नात तिने प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढला. पोलीस सध्या या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुराव्यांची कसून तपासणी करत आहेत.
News Title: Ketan Agarwal family first reject marriage with Siya Goyal then wthat happened






