KDMC मध्ये मोठा भूकंप! शिंदे गट-मनसेची ‘पॉवरफुल’ युती; भाजपला सत्तेतून बाहेर खेचण्याची तयारी?

On: January 21, 2026 2:22 PM
Shrikant Shinde
---Advertisement---

KDMC Mayor News | कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेत महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असून, युतीत लढलेल्या भाजपसमोर विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे KDMC च्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलेलं होतं. ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांमुळे सत्तास्थापनेचे गणित सतत बदलत होते. अखेर कोकण भवन, नवी मुंबई येथे नगरसेवक गट नोंदणी प्रक्रियेदरम्यान शिवसेना शिंदे गटाने निर्णायक चाल टाकत सत्ता स्थापनेचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Kalyan Dombivli Municipal Corporation)

शिंदे गट-मनसे आघाडीचा सत्ता दावा :

शिवसेना शिंदे गटाने कोकण आयुक्तांकडे महापालिकेत सत्ता स्थापनेचा अधिकृत दावा केला आहे. त्यांच्या सोबत मनसेनेही पाठिंबा दिल्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-मनसेचा महापौर होणार असल्याचा ठाम दावा केला आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडे ५३ नगरसेवक आहेत, ठाकरे गटातील बंडखोर ४ जणांचा पाठिंबा मिळाल्याचं सांगितलं जात आहे, तर मनसेकडे ५ नगरसेवक आहेत. या बंडखोरांपैकी दोन जण पूर्वी मनसेचे असून त्यांनी ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. उर्वरित दोन जण शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरे गटातून लढून विजयी झाले होते. या सर्व समीकरणांमुळे शिंदे गट-मनसे आघाडीने बहुमत गाठल्याचा दावा केला जात आहे.

KDMC Mayor News | भाजपला धक्का, सत्ता दूर जाण्याची चिन्हे :

कल्याण-डोंबिवली महापालिकेत (Kalyan dombivli election) निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती होती. भाजपचे ५० उमेदवार विजयी झाले होते आणि त्यानंतर महापौर पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, आता शिंदे गटाने मनसेला सोबत घेत स्वतंत्र बहुमत तयार केल्याने भाजपच्या सत्तास्थापनेच्या आशांवर पाणी फिरल्याचं चित्र आहे. (KDMC Mayor News)

या घडामोडींमुळे युतीतील राजकारणात तणाव वाढला असून भाजपला विरोधी बाकावर बसावं लागण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता कुणाच्या हाती जाणार, याबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट होत असताना, आगामी काळात राजकीय घडामोडी आणखी वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: KDMC Power Shift: Shinde Sena-MNS Alliance Stakes Claim on Mayor Post, BJP Likely to Sit in Opposition

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now