KC-135 Aircraft Crash| इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच ट्रम्पला एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) गुरुवारी पुष्टी केली की, त्यांचे KC-135 स्ट्रॅटो tanker विमान इराकच्या पश्चिम भागात कोसळले आहे. इराणसोबत सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेने गमावलेले हे चौथे मोठे विमान असल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासाठी हा मोठा लष्करी धक्का आहे.
अपघाताचा थरार आणि रेस्क्यू ऑपरेशन
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत लष्करी हालचालींचा भाग असताना घडली. या मोहिमेत दोन विमाने सामील होती. त्यापैकी एक KC-135 विमान इराकच्या हवाई क्षेत्रात अचानक कोसळले, तर दुसरे विमान सुदैवाने सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यशस्वी झाले. विमानात असलेल्या क्रू मेंबर्सचा शोध घेण्यासाठी अमेरिकन लष्कराने तातडीने शोध आणि बचाव मोहीम (Rescu Operation) हाती घेतली आहे.
CENTCOM ने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक तपासात हा अपघात शत्रूच्या हल्ल्यामुळे किंवा शत्रूच्या गोळीबारामुळे झालेला नाही. तसेच, कोणत्याही मित्र राष्ट्राच्या ‘फ्रेंडली फायर’मध्ये हे विमान पडलेले नाही. तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काय आहे KC-135 विमानाचे महत्त्व?
KC-135 हे विमान गेल्या 60 वर्षांपासून अमेरिकन वायू दलाचा कणा राहिले आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे हवेतील इंधन पुरवठा: हे विमान प्रामुख्याने फायटर जेट्सना हवेतच इंधन भरण्याचे (Aerial Refueling) काम करते. यात सामान्यतः पायलट, को-पायलट आणि ‘बूम ऑपरेटर’ असे तीन सदस्य असतात. हे विमान 37 प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे.
या युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन लष्कराला कुवेतमध्येही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी कुवेती हवाई संरक्षण यंत्रणेने चुकून अमेरिकेची तीन F-15E स्ट्राइक ईगल फायटर जेट्स पाडली होती. ही ‘फ्रेंडली फायर’ची घटना तेव्हा घडली होती जेव्हा इराणकडून मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू होते. सुदैवाने, त्या घटनेतील सहाही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले होते.
सध्या इराक आणि कुवेत या दोन्ही ठिकाणी अमेरिकन लष्कराच्या हालचाली वाढल्या असून, वारंवार होणाऱ्या विमान अपघातां मुळे अमेरिकेच्या हवाई मोहिमांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.








