“सगळं होऊनही छातीचा कोट करुन अजितदादांकडून धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित दादांना…”

On: January 31, 2025 12:39 PM
Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Political Decisions
---Advertisement---

Jitendra Awhad | बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. “हा माणूस नशीबवान आहे, सगळं होऊनही दादा छातीचा कोट करून उभे आहेत,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि अजित पवारांना लक्ष्य केले.

धनंजय मुंडे यांच्याबाबत आव्हाडांचा गौप्यस्फोट

धनंजय मुंडेवर निशाणा साधत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी एकत्र असताना घडलेल्या काही गोपनीय घटनांचा खुलासा केला आहे. त्यांनी २०१९ मधील एक किस्सा सांगत पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पालकमंत्रिपदांसाठी स्पर्धा सुरू होती. त्यावेळी माझ्या वाट्याला पालघर जिल्हा येईल असं वाटत होतं, पण… अशी सुरुवात करत आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की, दादा रायगड जिल्हा सोडायला तयार नाहीत. माझे तीन आमदार आहेत आणि ते पण हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे पालघर घ्या, रायगड सोडा. त्याच वेळी अजित पवारांनी सांगितलं की, शिंदे साहेब पालघर सोडायला तयार नाहीत,” असं आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

“सत्य देवाला माहीत, पण मी पालकमंत्री होऊ शकलो नाही”

आव्हाड यांनी पुढे सांगितले की, “सत्य देवाला माहीत, पण मी पालकमंत्री होऊ शकलो नाही. अखेर शरद पवार साहेबांमुळे माझ्याकडे सोलापूरची जबाबदारी आली. मात्र, काही दिवसांतच माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मला पदावरून हटवण्यात आलं. काही तासांतच भरणे मामांना ती जबाबदारी दिली गेली. जर अजित पवारांनी थोडे दिवस थांबावं ठरवलं असतं, तर कदाचित वेगळं चित्र असतं.”

“अशा अनेक जखमा आहेत” – आव्हाड

यावरून संतप्त झालेल्या आव्हाड (Jitendra Awhad) यांनी थेट अजित पवारांवर टीका करत “अशा अनेक जखमा आहेत, पण मी कधीच त्याचा हिशोब मांडला नाही,” असं विधान केलं. “मी हे केलं, मी ते केलं, असं कधीही सांगितलं नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या नेतृत्वशैलीवरही प्रश्न उपस्थित केला.

Title : Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Political Decisions

Join WhatsApp Group

Join Now