Maharashtra | राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी आज आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून त्यांनी संकेत दिल्यानंतर अखेर त्यांनी आज अधिकृत निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या राजीनाम्यानंतर त्यांना एका मोठ्या पक्षाकडून ऑफर मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवा चेहरा, नवी जबाबदारी :
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. जयंत पाटील यांनी सात वर्षे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सांभाळली. वर्धापन दिनाच्या भाषणात त्यांनीच “नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी” अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा अपेक्षित मानला जात होता.
जयंत पाटील यांच्यावर भाजप व अजित पवार गटात जाण्याबाबत याआधीही अनेकदा चर्चा झाली होती. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी ती नाकारली. परंतु आता प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांच्या राजकीय अस्वस्थतेला अधिक अधोरेखित करण्यात येत आहे.
Maharashtra | अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांचे संकेत :
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) यांनी सूचक वक्तव्य करत म्हटलं, “जयंत पाटील आमच्याकडे आले, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. ते आधीपासूनच काही कार्यक्रमांना फडणवीसांसोबत दिसत होते. त्यामुळे त्यांचं अस्वस्थपण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय होता.”
राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे की जयंत पाटील यांना एका राष्ट्रीय पक्षाकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. अद्याप त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, पण त्यांच्या पुढच्या पावलांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांची पुढील रणनीती राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करू शकते.






