Israel Iran War | मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती अधिकच गंभीर होत असून इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्याकडे झुकताना दिसत आहे. पुढील काही आठवडे हा संघर्ष कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडामोडींमध्ये इराणला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र असून त्यातच नव्या विधानांनी परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र, जागतिक हालचाली वाढल्या :
इराण आणि अमेरिका (United States of America) यांच्यातील वाद उघड युद्धात परिवर्तित झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने तब्बल 300 इराणी क्षेपणास्त्र निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने परिस्थिती लक्षात घेऊन सुमारे 50 हजार सैनिक सज्ज ठेवले असून सागरी सुरक्षेबाबत पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इराणने युद्धकाळात अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणची राजधानी तेहरान (Tehran) येथे अलीकडेच भीषण हल्ला करण्यात आला. या सर्व घटनांदरम्यान अमेरिकेने स्पेन (Spain) सोबतचे व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेत मोठा धक्का दिला. तसेच दुबई (Dubai) आणि पाकिस्तान (Pakistan) येथे राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना तातडीने त्या देशातून बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले. कोणताही उपलब्ध मार्ग वापरून देश सोडावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
Israel Iran War | सर्वोच्च नेत्यांवर सलग कारवाई, इस्त्रायलचा इशारा :
इराणसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर दुबईतील अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला झाला, तर पाकिस्तानमध्येही आंदोलकांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. युद्धाला 24 तास पूर्ण होण्याआधीच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा अमेरिका आणि इस्त्रायलच्या कारवाईत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
खामेनेई यांच्या निधनानंतर अली रजा अराफी (Ali Reza Arafi) यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली; मात्र काही वेळातच त्यांनाही ठार करण्यात आले. त्यानंतर आयातुल्ला अली खामेनेई यांचे सुपुत्र मोज्तबा होसेनी खामेनेई (Mojtaba Hosseini Khamenei) यांची नव्या सर्वोच्च नेते म्हणून घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर इस्त्रायलने अत्यंत आक्रमक भूमिका घेत खामेनेई यांच्या वारसालाही संपवू, असा इशारा दिला.
या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. युद्ध सुरू होऊन काहीच दिवस झाले असताना दोन सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू झाल्याने संघर्षाची तीव्रता स्पष्ट होत आहे. इराणला उघड पाठिंबा देण्यासाठी कोणताही देश पुढे आलेला नसतानाही इराणकडून संघर्ष जोरदारपणे सुरू असल्याचे दिसत आहे.






