Iran Blocks Pakistani Ship | मध्य-पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) सध्या अमेरिकेच्या (USA) सूचनेनुसार विविध करारांवर काम करत आहे. मात्र, याच काळात इराणने (Iran) पाकिस्तानला मोठा राजनैतिक धक्का दिला आहे. आखाती देशातून कराचीच्या (Karachi) दिशेने प्रवास करणाऱ्या ‘सेलान’ (Sellan) नावाच्या व्यापारी जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) पुढे जाण्यास इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला असून त्याला माघारी धाडले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज रोखले
संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथून निघालेले हे मालवाहू जहाज पाकिस्तानच्या बंदराकडे मार्गक्रमण करत होते. मात्र, इराणच्या जलसीमेतील महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझमधून जाण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत परवानगी या जहाजाकडे नसल्याचे इराणी प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी, या जहाजाला आपला नियोजित मार्ग सोडून पुन्हा अमिरातीच्या दिशेला वळावे लागले. काबूल (Kabul) येथील इराणच्या दूतावासाने या कारवाईला दुजोरा दिला असून, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड नेव्हीने (Islamic Revolutionary Guard Corps Navy) या जहाजाचा मार्ग अडवल्याचे सांगितले.
या घटनेबाबत अद्याप पाकिस्तान सरकारकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही, तसेच संयुक्त अरब अमिरातीने देखील या प्रकरणावर मौन बाळगले आहे. ‘इक्वासिस’च्या माहितीनुसार, ‘सेलान’ हे २००० मध्ये बांधलेले एक लहान फिडर कंटेनर जहाज असून त्याची मालवाहू क्षमता ६,८५० टन इतकी आहे. हे जहाज शारजा (Sharjah) जवळ भरण्यात आले होते आणि ओमान (Oman) मार्गे प्रवास करत असताना आयआरजीसीच्या (IRGC) इशाऱ्यांनंतर त्याला आपला मार्ग बदलावा लागला. या जहाजावर नेमका कोणत्या प्रकारचा माल होता, याची माहिती अद्याप गोपनीय आहे.
पाकिस्तानसाठी वाढत्या अडचणी आणि राजनैतिक अपयश
पाकिस्तानसाठी ही घटना अत्यंत मानहानीकारक मानली जात आहे, कारण इराणने यापूर्वी अनेक पाकिस्तानी जहाजांना या मार्गावरून जाण्याची मुभा दिली होती. ‘सेलान’ जहाजाला अचानक रोखण्याची कृती अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्लामाबाद (Islamabad) येथे इराणसोबत एका महत्त्वाच्या शांतता करारावर चर्चा होणार आहे. एका बाजूला चर्चेची तयारी सुरू असताना इराणने घेतलेली ही कठोर भूमिका पाकिस्तानसाठी अनपेक्षित धक्का ठरली आहे.
या पेचप्रसंगानंतर गेल्या २४ तासांत पाकिस्तानी यंत्रणांनी इराणच्या उच्चपदस्थ नेत्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. खुद्द पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाजेश्कियान (Masoud Pezeshkian) यांच्याशी या विषयावर संवाद साधला. देशाच्या प्रमुखांनी चर्चा करूनही इराणी लष्करी दलाने पाकिस्तानी जहाजाला वाट करून दिली नाही, यावरून पाकिस्तानचे इराणसोबतचे संबंध हाताळण्याचे कौशल्य कमी पडत असल्याची टीका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे.






