पावसामुळे IPL फायनल रद्द झाल्यास विजेतेपद कोण जिंकणार? वाचा सविस्तर अहवाल

On: May 30, 2026 6:15 PM
IPL 2026 Final
---Advertisement---

IPL 2026 Final | आयपीएल 2026 (IPL 2026) च्या अंतिम सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. 31 मे रोजी अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना पूर्ण होऊ शकला नाही तर ट्रॉफी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

फायनलसाठी विशेष नियम लागू :

यंदाच्या हंगामात बंगळुरू संघाने क्वालिफायर-1 जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसरीकडे 29 मे रोजी झालेल्या क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा पराभव करून गुजरातने फायनलमध्ये स्थान निश्चित केले. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये जेतेपदासाठी रंगतदार संघर्ष पाहायला मिळणार आहे.

अंतिम सामन्यासाठी आयपीएलने राखीव दिवसाची (Reserve Day) तरतूद केली आहे. 31 मे रोजी पावसामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही किंवा खेळ सुरू असताना थांबवावा लागला, तर पुढील दिवशी सामना ज्या टप्प्यावर थांबला होता, त्याच स्थितीतून पुन्हा सुरू केला जाईल. त्यामुळे हवामानाचा परिणाम होऊनही विजेता निश्चित करण्यासाठी आयोजकांकडे अतिरिक्त वेळ उपलब्ध राहणार आहे.

राखीव दिवशीदेखील पावसाचा अडथळा कायम राहिला, तर पंच कमी षटकांचा सामना घेण्याचा प्रयत्न करतील. डकवर्थ-लुईस-स्टर्न (Duckworth-Lewis-Stern) अर्थात DLS नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 षटके खेळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सामना कमी षटकांचा झाला तरी विजयी ठरणाऱ्या संघालाच आयपीएल ट्रॉफी बहाल केली जाईल.

IPL 2026 Final | सामना पूर्णच झाला नाही तर काय? :

जर 31 मे आणि राखीव दिवस अशा दोन्ही दिवशी हवामानामुळे एकही षटक टाकणे शक्य झाले नाही, तर ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये विभागली जाणार नाही. अशा वेळी स्पर्धेच्या साखळी फेरीतील गुणतालिकेच्या आधारे विजेता ठरवण्याचा नियम लागू केला जातो.

लीग टप्पा संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ +0.783 नेट रनरेटसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. त्यामुळे पावसामुळे अंतिम सामना आणि राखीव दिवस या दोन्ही दिवशी खेळ होऊ शकला नाही, तर नियमांनुसार बंगळुरू संघाला थेट विजेता घोषित करण्यात येईल आणि ट्रॉफीही त्यांच्याकडे जाईल.

दरम्यान, गुजरात राज्यात 30 मेपासून प्री-मॉन्सून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः साबरकांठा, मेहसाणा, गांधीनगर, महिसागर, खेडा, दाहोद, पंचमहल, आनंद, अहमदाबाद आणि वडोदरा (Vadodara) परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र हवामान संस्थेच्या अंदाजानुसार 31 मे रोजी संध्याकाळी अहमदाबादमध्ये वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. ढगांचे प्रमाण सुमारे 28 टक्के राहील, तर पावसाची शक्यता केवळ 2 टक्के असल्याने फायनल सामना निर्विघ्नपणे पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: IPL Final Rain Rule Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now