iPhone 17 Price Hike | ॲपल (Apple) स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बाजारात समोर आलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या सुरुवातीपासून iPhone 17 सीरिजच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे कंपनी नवीन स्टॉकसह दर वाढवू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
ऑगस्टपासून दर वाढण्याची शक्यता :
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून iPhone 17 सीरिजच्या किंमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. यापूर्वी अॅपलने भारतात आयपॅड (iPad), मॅक (Mac), मॅकबुक (MacBook), ॲपल टीव्ही (Apple TV) आणि होमपॉड (HomePod) यांसारख्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, आयफोनच्या किमतींमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. आता नवीन स्टॉक बाजारात येण्यापूर्वी आयफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन iPhone चा स्टॉक पुढील आठवड्याच्या अखेरीस भारतातील डीलर्सकडे पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्या किरकोळ विक्रेत्यांकडे आयफोनची उपलब्धता मर्यादित असल्याचेही सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी नवीन पुरवठ्यासोबत सुधारित किंमती लागू करू शकते, अशी चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू आहे.
iPhone 17 Price Hike | Pro मॉडेल्स आणि जागतिक दरवाढीचा परिणाम :
iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या मॉडेल्सच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या या मॉडेल्सच्या सुरुवातीच्या किंमती अनुक्रमे ₹1,34,900 आणि ₹1,49,900 आहेत.
मात्र, संभाव्य वाढीनंतर त्यांची नवीन किंमत किती असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच iPhone Air च्या किंमतीत बदल होणार की नाही, याबाबतही कोणतीही पुष्टी झालेली नाही. दरम्यान, ॲपलने अलीकडेच जपान (Japan) मध्ये iPhone च्या किंमतीत 11.3 टक्क्यांची वाढ केली आहे.






