Scam | ऑनलाईन शेअर बाजारातून अवास्तव नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कल्याणमध्ये (Kalyan Fraud News) राहणाऱ्या एका नोकरदार व्यक्तीला ८०० टक्के नफा मिळेल असे सांगत तब्बल ७१ लाख ३८ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिया, अनुष्का डे आणि यशस्वी शर्मा या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून संपर्क, बनावट अॅपद्वारे फसवणूक :
ही घटना एप्रिल २०२५ ते जून २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत घडली. संशयितांनी व्हॉट्सॲप आणि विविध मोबाईल क्रमांकांद्वारे कल्याणच्या सुनील रामचंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमधून ८०० टक्के नफा मिळेल असे सांगत त्यांना एका फसव्या गुंतवणूक अॅपची लिंक डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
यादव यांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यानंतर त्यांना बनावट नफ्याचे स्क्रीनशॉट दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, जेव्हा त्यांनी मूळ रक्कम व नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेगवेगळी कारणे देत पैसे परत देण्यास नकार दिला गेला.
Scam | ७१ लाखांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक :
कल्याण-मुरबाड रोडवरील सिंडिकेट परिसरात राहणारे यादव यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ७१,३८,४९० रुपये ही रक्कम विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडली गेली. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोपान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था, व्यक्ती अथवा अॅपची विश्वासार्हता नीट तपासा.






